Ad will apear here
Next
चैत्रगौरी ची आवराआवर


आमच्या लहानपणी घरोघरी चैत्रगौर महिनाभर माहेरवाशीण म्हणून यायची. तिचे हळदीकुंकू घरोघरी झोकात व्हायचे. त्या वेळी महिलांच्या शब्दकोशात, आळस, दमणूक, अशक्तपणा हे शब्दच नव्हते. 

कामसू पणाचं वरदान जन्मजात मिळालं होतं. प्रफुल्ल चेहऱ्यानं गौरीची आरास, हळदीकुंकू केलं जायचं. मिक्सर ग्राइंडर यांचा शोध लागला नव्हता. उखळ-मुसळ, जातं, पाटा-वरवंटा ही आयुधं घराची शान वाढवत असत. ब्युटी पार्लर चा जमाना आला नव्हता. वासाचा साबण, फेस पावडर सुद्धा  मुश्किलीने मिळत असे.

 पण आत्मिक समाधानाने चेहरे खुलून दिसत असत. ठेवणीतली एकच साडी वर्षानुवर्षे निगुतीने सांभाळून चापून-चोपून नेसली की गर्भश्रीमंतीचा फील यायचा. जुनेच सोन्या मोत्याचे दागिने रिठ्याने किंवा शिककाईने लख्ख करून अंगावर घातले की प्रत्येक स्त्री साक्षात लक्ष्मी वाटायची." खाऊन माजावं, टाकून माजू नये" हा जीवन मंत्र होता.

   हळदी कुंकू झाले की प्रथम पडदे काढले जायचे. पडदे जुन्या जरीच्या साड्यांचे असायचे. दुसरे दिवशी ते उन्हात वाळवायचे. चैत्रातलं ऊन लागलं कि कपड्यांना कसर लागत नाही. नंतर त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ट्रंकेत ठेवल्या जायच्या. आई त्यात चार लवंगा टाकायची कसर लागू नये म्हणून. समोर ठेवलेली खेळणी चित्रे स्वच्छ पुसून एका पेटीत ठेवली जायची. अत्तर दाणी, गुलाब दाणी, चांदीचा करंडा , ताट, वाट्या, भांडी देवाची उपकरणी, सर्व चांदीची भांडी स्वच्छ धुवून पुसून कपाटात ठेवली जायची.

कैरीची डाळ पन्हे 
उरलेल्या हरभर्‍याची उसळ शक्यतो रात्रीच संपवण्यात यायचे पण कधीकधी ते उरायचे मग आई त्या पातेल्या ना ओले फडके गुंडाळून पाण्याने भरलेल्या तसराळ्यात ठेवायची. फ्रीज चा जन्म अजून झाला नव्हता. पण काहीही वाया घालवायचे नाही यासाठी खालील युक्त्या योजल्या जात.

1) डाळ करताना कैरीचा कीस वेगळा ठेवून लागेल त्या प्रमाणात मिक्स करायचा त्यामुळे डाळ आंबत नसे.

2) उरलेली डाळ रात्रीच कढईत खमंग परतून कुरकुरीत केली जायची. पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की ,ती टिकत असे. शिवाय नवीन पदार्थ म्हणून चट्टा मट्टा होत असे.

3) डाळ दुसऱ्यादिवशी पाट्यावर रवाळ वाटून
कढईत फोडणीला टाकून परतून नाश्त्याला नवीन पदार्थ मिळत असे

4) डाळ थोडीच असेल तर वाटून त्यात थोडे तांदळाचे पीठ घालून वडे तळले की
जेवणात पानाची शोभा वाढायची.

5) ती डाळ आहे तशीच तळून त्यात शेंगदाणे कढीपत्ता खोबर्‍याचे काप घालून खमंग चिवडा तयार करायचा.

6) डाळीला किंचित् वास येत असल्यास ती वाटून त्यात भरपूर कांदा लसूण कोथिंबीर कढीपत्ता व थोडे भाजणीचे पीठ घालून खमंग वडे किंवा थालीपीठ करत.

7) केलेला पदार्थ गरम आहे तोपर्यंत शेजारी पाजारी वाटून टाकत.

8) डाळ वाटून त्यात थोडे उडदाचे पीठ घालून छोटे छोटे भाजी चे सांडगे घालत.

9) डाळ वाळवून, दळून ठेवत. त्याची धिरडी पाटवड्या मस्त होत असत.
असे अनेक सुगरिणीं चे सल्ले मला अजून तोंड पाठ आहेत.

या पदार्थाचे मूळचे नाव कैरीडाळ, आंबाडाळ, डाळ कैरी किंवा डाळीची कोशिंबीर पण ती वाया जाऊ नये म्हणून अशा अनेक पदार्थांच्या रूपात ती जेव्हा बशीत यायची तेव्हा कशापासून काय केले आहे हे कुणालाच कळत नसे.

  ओटीच्या भिजवलेल्या हरभऱ्याची उसळ सुद्धा कधी ओले वाटाणे घालून, कधी भिजवलेले शेंगदाणे घालून, कधी ओले खोबरे किसून किंवा खोवून किंवा काप करून, कधीही शेंगदाण्याचे कूट घालून कधी भरपूर कोथिंबीर तर कधी भरपूर कढीपत्ता घालून अशा वेगवेगळ्या रुपात नटून सजून खाणाऱ्याची भूक वाढवायची. 
ती उरली तर दुसरे दिवशी भरपूर जिरे खोबरे घालून त्याचे कढण गरम गरम पिताना ब्रम्हानंदी टाळी लागायची. आमची आई ते हरभरे तव्यावर फोडणी तिखट मीठ घालून परतून " चटपट चणे "
हा वेगळा खाऊ आम्हाला द्यायची. कधीकधी ते हरभरे तेलावर खमंग परतून उखळात कुटून शेंगदाण्याचे कूट घालून त्याची फर्मास आमटी करायची. पण एकही हरभरा वाया घालवू द्यायची नाही.

हे सारे करताना ती वाटीतली अन्नपूर्णा संतुष्ट होऊन
 आशीर्वाद द्यायची " अन्नदाता सुखी भव".

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OTNTCY
Similar Posts
उगारची चैत्रगौर "आता येईन चैत्र मासी" असे हादग्याच्या गाण्यातून वचन दिल्याप्रमाणे चैत्रगौर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षात तृतीयेला माहेरवाशीण म्हणून सन्मानाने यायची. ती पहिली तीज असायची.
मनोबोध - भाग १९४-१९५ : राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे मनाच्या श्लोकांवरील निरूपण (व्हिडिओ) समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केलेले निरूपण - व्हिडिओ क्रमांक १९४ आणि १९५...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language